नाणं आधीच ठरलेलं

नाणं आधीच ठरलेलं अनिश्चितता - नशीब आणि जुगार-निर्णय यातला फरक

द्रौपदीच्या स्वयंवरानंतर युधिष्ठिर राजा झाला होताच. त्याला उद्ध्वस्त केलं ते फासे (डाईस) चा एक डाव.

तो हरला कारण संधी समसमान होती आणि नशीब उलटं फिरलं – असं नाही. तो हरला कारण त्यानं एक ठरवून टाकलेला (rigged) डाव खरा समजला -जुने चुलतभाऊ, जुनी वैरं, आणि शकुनीचे ते फासे, जे आयुष्यभर ‘हरायला’ शिकलेले होते, जेणेकरून समोरचा खरोखर हरेल. युधिष्ठिरानं आधी राज्य पणाला लावलं. मग भाऊ. मग स्वतःला. मग पत्नीला. शेवटच्या फेकीपर्यंत त्याला वाटत राहिलं, की तो तेच करतोय जे एका राजानं करायला हवं- एक मोजूनमापून घेतलेला धोका (calculated risk).

 

तो राजासारखा वागत नव्हता. तो एक सावज (mark) होता.

 

चारशे वर्षांनंतर कौटिल्यानं हेच कारण लिहून ठेवलं. राजाला बुडवणाऱ्या व्यसनांमध्ये – अर्थशास्त्रात – मद्य आणि कामासक्तीच्याच रांगेत द्यूत (जुगार) चं नाव येतं. धोका पत्करणं लाजिरवाणं आहे म्हणून नव्हे; जो राजा काहीच पणाला लावत नाही, तोही राज्य करायला लायक नसतो. पण फाशांच्या डावात – पिकाच्या हंगामात किंवा युद्धमोहिमेत असते तशी – उभं राहायला जागाच नसते. भूगोल नाही. माहिती नाही. तराजू आपल्या बाजूला झुकवणारं कसलंही कौशल्य नाही.

 

जुगार म्हणजे अनिश्चितता नव्हे. जुगार म्हणजे अनिश्चिततेतून तिला समजून

घेणारी सगळी चौकट शस्त्रक्रिया करून काढून टाकलेली अवस्था.

 

जुगाराची हीच सगळ्यात जुनी व्याख्या आहे. आणि आजचा भारत नेमकी हीच व्याख्या विसरत चाललाय.

 

दर काही महिन्यांनी हाच युक्तिवाद कुठल्या ना कुठल्या रूपात परत येतो. सर्जन (surgeon) निदानावर पैज लावतो. उद्योजक (founder) आपली सर्वोत्तम वर्ष एका कल्पनेवर लावतो. नोकरदार आपलं ऐन उमेदीचं आयुष्य एका संस्थेवर लावतो. शेतकरी पावसावर लावतो. मग फक्त ट्रेडरलाच जुगारी का म्हणायचं?

 

आम्ही ट्रेडमध्ये असताना आम्हांला जुगारी म्हणतात. ट्रेड फळली, की

त्यालाच ‘दूरदृष्टी’ म्हणतात.

 

हा युक्तिवाद भुरळ घालणारा आहे. तो अपुराही आहे आणि तो अपुरेपणा महत्त्वाचा आहे.

 

सर्जन शरीररचना, इमेजिंग आणि वर्षानुवर्षं साठलेल्या संभाव्यतेतून निदान वाचतो. शेतकरी ऋतू, माती आणि आयुष्यभर पाहिलेला पावसाचा नमुना वाचतो. उद्योजक बाजारपेठेचा अभ्यास करतो आणि वास्तव योजनेच्या विरोधात गेलं, की बदलतो. हे सगळं म्हणजे माहितीवर आधारित अनिश्चितता – मर्यादित, स्थानिक, पुनरावृत्तीतून घडलेली.

 

शेअर बाजार स्थानिक नाही. तिथे लाखो सहभागी आहेत, ज्यांच्यापैकी अनेकांकडे तुमच्यापेक्षा जास्त माहिती, वेगवान यंत्र आणि स्वस्त भांडवल आहे मीटिंगमधल्या फावल्या वेळात अॅप उघडणाऱ्या माणसापेक्षा कितीतरी जास्त. या आखाड्यात उतरणं म्हणजे नुसता धोका पत्करणं नव्हे. तुम्ही स्पर्धा करत आहात अशा माणसांशी आणि यंत्रांशी, जी खास तुमचे पैसे काढून घेण्यासाठी बनवलेली आहेत. या आखाड्यात माहितीशिवाय घेतलेला धोका काही क्षणांतच जुगारात बदलतो. गेली तीनशे वर्षं बाजार हेच सिद्ध करत आलाय.

 

पहिला जुगार अड्डा मुंबईत नव्हता

दलाल स्ट्रीटच्या खूप आधी अॅमस्टरडॅम होतं. डच ईस्ट इंडिया कंपनीनं खरेदी-विक्री करता येणारे शेअर्स काढले आणि सार्वजनिक भांडवल बाजाराचा एक पाया घातला. आणि १६३६ च्या हिवाळ्यात डचांना असं काहीतरी सापडलं, जे प्रत्येक पिढीला पुनःपुन्हा शिकावं लागतं – चांगली गोष्ट (story) चांगल्या गणितापेक्षा जास्त वेगानं पसरते.

 

हे प्रथम एका फुलाच्या बाबतीत घडलं. दुर्मीळपणामुळे भाव खाणाऱ्या ट्युलिपच्या कंदांचे (bulbs) भाव अशा थराला पोचले, की आधी कुठल्याच फुलानं गाठले नव्हते. एक ‘सेम्पर ऑगस्टस’ कंद एका कालव्याकाठच्या घराच्या किमतीला विकला गेला. जानेवारीच्या सुरुवातीला ६४ गिल्डरला मिळणारा एक ‘विट्टे क्रोनेन’ कंद पाच आठवड्यांत १,६०० गिल्डरहून अधिक किमतीला गेला. दारूभट्टीवाले, सुतार, अगदी धूरडी साफ करणारेही घरं गहाण ठेवून असे कंद विकत घेत होते, जे त्यांना कधी लावायचेच नव्हते- फूल हा मुद्दाच उरला नव्हता. फेब्रुवारी १६३७ पर्यंत खरेदीदार गायब झाले, करार मोडले गेले आणि कंद पुन्हा एकदा – फक्त कंद उरले.

 

ऐंशी वर्षांनी हीच मानसिकता आणखी मोठ्या रंगमंचावर अवतरली. पॅरिसमध्ये जॉन लॉच्या मिसिसिपी कंपनीचे शेअर्स एका वर्षात सुमारे ५०० लिव्रवरून जवळपास १०,००० लिव्रपर्यंत गेले; गर्दी आवरण्यासाठी सैनिक तैनात करावे लागल्याचं सांगितलं जातं. लंडनमध्ये साउथ सी कंपनीनं अशी गोष्ट सांगितली, की प्रत्येकाला त्यात उतरायचं होतं, आणि प्रत्येकाकडे त्याचं एक कारण होतं. मग गोष्ट बदलली. दोन्ही कंपन्या काही महिन्यांच्या फरकानं कोसळल्या –  फोर्च्यूनसोबतच, इंग्लंडमध्ये अनेक राजकीय कारकीर्दीही घेऊन गेल्या.

 

लंडनमधल्या उद्ध्वस्तांमध्ये इंग्लंडमधला सर्वात तर्कशुद्ध माणूसही होता. आयझेंक न्यूटननं साउथ सी शेअर्स लवकर घेतले, बाजारातली धुंदी ओळखली आणि वर असतानाच नफा घेऊन विकून टाकले. मग तो न घेताच भाव आणखी चढताना पाहत राहिला आणि शिखराजवळ पुन्हा शिरला. कोसळताना त्याला सुमारे २०,००० पौंडांचा फटका बसला – एवढी मोठी रक्कम, की ती त्यानं पुन्हा कधी भरून काढली नाही. न्यूटन सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहाची कक्षा मोजू शकत होता. तो ज्या गर्दीत उभा होता, तिचं गणित मात्र त्याला जमलं नाही – आणि नंतर त्यानं ते मान्यही केलं.

 

उत्तम बुडबुडे (bubbles) कधीच पूर्णपणे मूर्खपणाचे नसतात. त्यांच्यात

थोडं सत्य असतं, आणि मग खूप जास्त आशावाद.

 

तीनशे वर्षांनंतर, कॉफी हाऊसची जागा स्मार्टफोननं घेतलीये, पण मानसिकता तसूभरही हलली नाही. हिरवी कँडल दिसते; हृदयाचे ठोके वाढतात. लाल कँडल दिसते; पोझिशन दुप्पट होते. एखादा व्हॉट्सअॅप ग्रुप ‘शंभर टक्के पक्का’ ट्रेड – जाहीर करतो. तो एकदा फळतो, आणि यादृच्छिक (random) घटनांची एक साखळी एखाद्या पद्धतीसारखी (system) भासू लागते.

 

इथेच नशीब हळूच घुसतं. आपण रुग्ण वाचवणाऱ्या सर्जनचं, युनिकॉर्न उभारणाऱ्या उद्योजकाचं, मल्टिबॅगर शोधणाऱ्या गुंतवणूकदाराचं कौतुक करतो -आणि आपल्याला ते समांतर विश्व कधीच दिसत नाही: तशीच निर्णयप्रक्रिया वापरूनही ज्याचा रुग्ण दगावला तो सर्जन, तेवढाच हुशार असूनही अपयशी ठरलेला उद्योजक, तोच जुळा स्टॉक घेऊन सगळं गमावलेला गुंतवणूकदार. बाजार प्रचंड ‘सर्व्हयव्हरशिप बायस’वर चालतो आपल्याला विजेते आठवतात. हरणारे नुसते संभाषणातून गायब होतात.

 

राकेश झुनझुनवाला यांनी ५,००० रुपयांचं फोर्च्यूनमध्ये रूपांतर केलं, आणि ही गोष्ट खरोखर विलक्षण आहे. पण ती वाटते तेवढं सिद्ध करत नाही – एखादा उत्तम निकाल हे फक्त दाखवतो, की एखादी व्यक्ती चांगले निर्णय घेऊ शकते; त्यातलं किती कौशल्यामुळे, किती धोका पत्करण्याच्या वृत्तीमुळे आणि किती बाजार अनुकूल होता म्हणून, हे नाही सांगत. पुरेशा मोठ्या संख्येनं हीच संभाव्यता वापरली, की कुणीतरी निव्वळ योगायोगानंही विलक्षण रेकॉर्ड तयार करतो. म्युच्युअल फंड मॅनेजर्सवरच्या संशोधनात काहींमध्ये खरोखरचं स्टॉक-निवडीचं कौशल्य आढळलंय आणि तितक्याच सातत्यानं हेही आढळलंय, की व्यावसायिकाच्या दीर्घकालीन रेकॉर्डमधूनसुद्धा हे कौशल्य नशिबापासून वेगळं काढणं सांख्यिकीयदृष्ट्या किती अवघड आहे. प्रशिक्षित मॅनेजर्सनाच दशकांचा डेटा असूनही हा प्रश्न अवघड जात असेल, तर सहा यशस्वी ट्रेडनंतर एका हौशी माणसानं फार आत्मविश्वास बाळगू नये.

 
मग सेबीनं (SEBI) एक असा आकडा मांडला, जो हा वाद संपवतो

भारताच्या भांडवल बाजार नियामकानं आता या तत्त्वज्ञानाखाली ठोस डेटा उभा केलाय. सेबीच्या FY26 च्या अभ्यासानुसार, वैयक्तिक इक्विटी डेरिव्हेटिव्ज (derivatives) ट्रेडर्सपैकी सुमारे ८७.७% जणांनी पैसे गमावले वर्षीच्या ९०.९% पेक्षा हे ‘सुधारलेलं’ दिसत असलं, तरी ते फक्त एवढ्यासाठी, की एकूण ट्रेडर्सची संख्याच खूप घटली होती, तर तोटा सोसणाऱ्यांचा सरासरी तोटा प्रत्यक्षात वाढलाच. जवळपास प्रत्येक ट्रेडरनं किमान एकदा तरी ऑप्शन्स (options) हाताळले होते; एकूण तोट्यापैकी सुमारे ९२% वाटा एकट्या ऑप्शन्सचा होता.

 

आणि प्रत्येक ट्रेड आणि त्याच्या निकालामध्ये एक शांत तिसरा भागीदार बसलेला असतो – ब्रोकरेज, STT, GST, स्टॅम्प ड्युटी, स्प्रेड आणि स्लिपेज. सेबीला असं आढळलं, की नुसत्या व्यवहार खर्चामुळे (transaction costs) सुमारे ४.४ लाख असे ट्रेडर्स, जे अन्यथा FY26 नफ्यात संपवू शकले असते, ते तोट्यात ढकलले गेले आणि यासाठी त्यांनी मिळून जवळपास २४,८५९ कोटी रुपये मोजले, फक्त खेळत राहण्याच्या हक्कासाठी. प्रत्येक जास्तीचा ट्रेड म्हणजे चुकण्याची आणखी एक संधी, आणि दुसऱ्या कुणासाठी तरी आणखी एक फी. 

 

हे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. अमेरिकेतल्या ६६,४६५ ब्रोकरेज कुटुंबांवरच्या एका महत्त्वाच्या अभ्यासात असं आढळलं, की सर्वाधिक सक्रियपणे ट्रेड करणाऱ्या गटानं त्याच काळात बाजारानं दिलेल्या १७.९% च्या तुलनेत फक्त सुमारे ११.४% वार्षिक परतावा कमावला – संशोधकांनी थेट निष्कर्ष काढला की ट्रेडिंग संपत्तीसाठी घातक आहे. तैवानमध्ये डे-ट्रेडर्सचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असं आढळलं, की अनुभवी ट्रेडर्सपैकीही फक्त एक छोटासा भाग सातत्यानं सकारात्मक परतावा मिळवत होता, आणि बहुतेक जण तोटा होऊनही ट्रेडिंग सुरूच ठेवत होते. ब्राझीलमध्ये, किमान ३०० ट्रेडिंग दिवस इक्विटी फ्युचर्समध्ये डे-ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींवरच्या अभ्यासात ९७% जणांनी पैसे गमावले, आणि अर्ध्या टक्क्याहूनही कमी जणांनी बँक टेलरच्या पगाराहून जास्त कमावलं – आणि चिकाटीनं काही शिकवलं, याचा कुठलाही पुरावा सापडला नाही.

 

वेगवेगळी शतकं, वेगवेगळे खंड पण त्याच टेबलाभोवती तीच गर्दी.

 

गुंतवणूक, सट्टा आणि जुगार

यातलं काहीही बाजाराला जुगार अड्डा बनवत नाही. तो निष्कर्ष तेवढाच आळशी आहे, जितका तो दुरुस्त करायला निघालाय.

 

गुंतवणुकीची सुरुवात एका सिद्धांतापासून (thesis) होते किंमत काय, त्याचा रोख प्रवाह (cash flows) कसा आहे, गोष्ट कोसळायला काय कारणीभूत ठरू शकतं, सुरक्षिततेचा फरक (margin of safety) किती आहे, आणि – जो प्रश्न आधीच जवळपास कुणीच विचारत नाही मी चुकलो हे कशामुळे मान्य करेन? सट्टा (speculation) याहून पूर्णपणे वेगळ्या ठिकाणाहून सुरू होतो – चार्ट वर जातोय, सेक्टर तापलाय, टार्गेट २,५०० आहे, ऑप्शन शुक्रवारी एक्सपायर होतोय. हे विश्लेषण नाही. ही स्प्रेडशीट घातलेली एक गोष्ट (narrative) आहे.

 

एखादी पद्धत निकालाची हमी देत नाही, आणि नेमकं हेच बाजाराला इतकं मानसिकदृष्ट्या धोकादायक बनवतं. एक सक्षम गुंतवणूक ३०% घसरू शकते.

 

एक भिकार गुंतवणूक ३००% वाढू शकते. दोन्हींपैकी कुठलीही घटना, तो निर्णय ज्या दिवशी घेतला गेला त्या दिवशी तो नेमका काय होता, हे बदलत नाही – जसं एखादा सर्जन निर्दोष शस्त्रक्रिया करूनही रुग्ण गमावू शकतो, किंवा शंकास्पद निर्णय घेऊनही रुग्णाला बरं होताना पाहू शकतो. एक निकाल जवळपास काहीच सांगत नाही. पुरेशा मोठ्या संख्येनं घेतलेल्या निर्णयांमधून फक्त प्रक्रियाच (process) काहीतरी सांगते.

 

“मी पैसे कमावले, म्हणजे मी बरोबर होतो” हे अर्थकारणातलं सर्वात

महागडं वाक्य आहे.

 

तुम्ही पैसे कमावले. एवढंच ते वाक्य सिद्ध करतं. कदाचित तुम्ही बरोबर होता. कदाचित तुम्ही लवकर होता. किंवा कदाचित तुम्ही बेजबाबदार होता, आणि यावेळी फासे तुमच्या बाजूनं पडले. बाजार वाईट वर्तनाला इतक्या वेळा बक्षीस देतो, की ते जिवंत राहतं – जर प्रत्येक बेजबाबदार ट्रेड लगेच बुडाला असता, तर बेजबाबदारपणा एका हंगामातच संपला असता. तो संपत नाही, कारण अधूनमधून तो फळतो, आणि ज्याला ते फळतं, तो साधारणपणे त्यातून नेमका चुकीचा धडा शिकतो.

 

शेवटी, हा फरक काही ओळींत बसण्याइतका साधा आहे.

 

जुगारी विचारतो, काय घडणार आहे. ट्रेडर विचारतो, ते घडण्याची संभाव्यता किती आहे. जुगारी पुढच्या निकालाचा विचार करतो. शिस्तबद्ध गुंतवणूकदार निकालांच्या संपूर्ण वितरणाचा (distribution) विचार करतो. जुगारी हरल्यावर पैज वाढवतो. शिस्तबद्ध गुंतवणूकदार पुरावा विरोधात गेला, की एक्सपोजर कमी करतो. जुगाराला बरोबर असायलाच हवं असतं. गुंतवणूकदाराला फक्त टिकून राहायचं असतं. 

जो शेतकरी आपली माती, पावसाची नोंद आणि पीक विमा (crop insurance) समजून घेतो, तो धोका सांभाळतोय. जो शेतकरी शेजाऱ्याला गेल्या हंगामात घबाड मिळालं म्हणून सगळं एकाच पिकावर गहाण ठेवतो, तो नांगरानं जुगार खेळतोय, फाशांऐवजी. साधन कधीच मुद्दा नव्हतं. वर्तन हाच मुद्दा आहे.

 

युधिष्ठिर खेळायला बसण्याआधीच शकुनीचे फासे ठरलेले होते तो डावाला तयार झाला, त्याच क्षणी निकाल निश्चित झाला होता. बाजाराचे फासे तसे ठरलेले नसतात. ते फक्त निरपेक्ष असतात दीर्घकाळात तयारीला बक्षीस देणारे, आणि क्वचित, क्रूरपणे, अल्पकाळात तयारीच्या अभावालाही बक्षीस देणारे.

 

म्हणून हा धडा दोन्ही बाजूंनी धरून ठेवा, कारण यातला एकच अर्धा भाग स्वीकारला, तर तो सापळा ठरतो. अनिश्चिततेला जुगार समजू नका सर्जन, उद्योजक आणि शिस्तबद्ध गुंतवणूकदार, हे सगळे आपल्याला जे कळत नाही त्यासोबतच जगतात, आणि तो काही दुर्गुण नाही. पण एखादी बेजबाबदार पैज फळली, म्हणून तिला शहाणपण समजू नका युधिष्ठिराला डाव आधीच हरल्यानंतरही, आणखी काही फेऱ्यांपर्यंत वाटत राहिलं, की तो अजूनही राजासारखाच खेळतोय.

 

तुम्ही ट्रेडमध्ये असताना स्वतःला काय म्हणवता, याच्याशी बाजाराला काही देणंघेणं नसतं. तो फक्त हिशोब ठेवतो. आणि टेबलाभोवतीच्या गर्दीसारखं, निकाल लागल्यावर तो कधीच मथळा बदलत नाही.

 

लेखक

डॉ. समीर एन. पालतेवार

 

लेखक | मार्गदर्शक |  विचारवंत

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *